Advertisement
अमेरिका-इराण युद्धाची झळ आपल्या शहरापर्यंत
पुणे : अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आता आपल्या शहरापर्यंत येऊन ठेपला आहे. युद्धामुळे पुण्यातल्या हॉटेल्सना एलपीजी गॅस मिळत नाही. परिणामी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळणं पूर्णपणे बंद झाले आहे. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाही. ज्या व्यावसायिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सिलिंडर घेऊन ठेवले होते, त्यांची सोय होऊ शकते. मात्र, सध्या नव्या सिलिंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यवसायिकांचे दोन दिवसांपासून मोठं नुकसान होत आहे. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील, येत्या दोन दिवसांत ८५ टक्के हॉटेल बंद होण्याची भीती आहे. अनेक हॉटेल्समध्ये गॅस नसल्याने चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात झाली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा पुण्यात बंद असल्याने दोन दिवसांत हॉटेल व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. पुढच्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्स बंद करावी लागतील, अशी परिस्थिती आहे. सध्या, पुण्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला असून फक्त घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या, तरी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
पुण्यात पोळी-भाजी केंद्रांपासून ते फाईव्हस्टार हॉटेल्सची संख्या मोठी आहे. पुणे शिक्षण आणि आयटी हब असल्यानं अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यातल्या हॉटेलमध्येच भूक भागवतात. मात्र युद्धाची झळ बसल्यानं हॉटेल्सचंही मोठं नुकसान होतंय आणि अनेक पुणेकरांनाही भूक भागवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची शोधाशोध करावी लागणार आहे.
