Advertisement
दामाजी चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा : प्रशासनाला निवेदन सादर
मंगळवेढा : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवेढा येथे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. दामाजी चौक येथून सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चानंतर शेतकरी व विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनाला निवेदन देत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शेतकरी प्रश्नांबाबत जोरदार घोषणा देण्यात आल्या. शासनाने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला असला तरी प्रत्यक्षात शेतकरी अजूनही अडचणीतच आहे, अशी टीका प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे, बीजपंपांची थकीत वीजबिले माफ करणे, २०२४ व २०२५ च्या खरीप रब्बी हंगामातील पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, तूर-मका हरभरा उत्पादकांसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करणे, घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देणे, बीडीओ कार्यालयातील प्रकरणाची चौकशी करणे, तसेच जलजीवन योजना, बीज प्रश्न आणि चारा छावणीबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
दामाजी पंतांच्या पावन भूमीत अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची परंपरा असून हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांचा असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
