#

Advertisement

Saturday, March 7, 2026, March 07, 2026 WIB
Last Updated 2026-03-07T15:29:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्त्वात सोमवारी मोर्चा

Advertisement

भाजप सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून देणार 

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता, शासनाने दोन लाख रुपयांची कर्जमाफी सभागृहात मंजूर केली आहे. परंतु, सातबारा कोरा करून देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची आठवण करून देण्यासाठी सोमवारी (ता. ९) शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षांच्या वतीने संत दामाजी चौकातून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालय तथा प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असून शासनाला निवेदन दिले जाणार आहे, असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पंढरपूर रोडवरील हॉटेल सुगरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेस दामाजी कारखान्याचे माजी संचालक मारुतीबापू वाकडे, मनसेचे नारायण गोवे, पांडुरंग जावळे, काँग्रेस कमिटी महिला तालुकाध्यक्ष आयेशा शेख, सौ. दिपाली जगताप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, निवडणुकीच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निधी नाही म्हणून हात वर केला जात आहे.  सरकार केवळ इव्हेंटबाजी करीत आहे. लाडक्या बहिणीसाठी निधी उपलब्ध करून देते परंतु, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पिक विमाला निधी उपलब्ध नाही, असे सांगत आहे. कागदी घोडे नाचणाऱ्या सरकारला जमिनीवरचे वास्तव दाखवण्याची गरज निर्माण असल्यामुळे सोमवारी सकाळी 11 वाजता दामाजी चौकातून प्रांत कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा नेत आहोत. 


या आहेत मुख्य मागण्या

  • शेतकऱ्यांना वीज बिलाची सर्व थकीत बिले माफ करून दिवसा आठ तास वीज देणे अत्यंत गरजेचे आहे.
  • 2024 व 2025 मधील खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम थेट देण्याची गरज आहे.
  • मका, हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबवण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावीत.
  • घरकुल योजनेसाठी पाच ब्रास वाळू मोजक्याच भागात दिली जाते तर ती सरसकट घरकुल योजनेसाठी दिली जावी. भूमिहीन कुटुंबांना शासनाने जागा देणे.