#

Advertisement

Friday, March 13, 2026, March 13, 2026 WIB
Last Updated 2026-03-13T11:05:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहित पवारांच्या आरोपाने राजकारणात भूकंप

Advertisement

अजितदादांच्या अपघाताचा पुरावा, विमानाच्या “ब्लॅकबॉक्स”मध्ये छेडछाड?

पुणे: दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताशी संबंधित ब्लॅकबॉक्समधील माहितीमध्ये छेडछाड होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हा दावा मांडला असून त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणि पारदर्शकतेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग हा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ब्लॅकबॉक्समधील महत्त्वाच्या माहितीमध्ये फेरफार करत असल्याची माहिती मिळत आहे. ब्लॅकबॉक्समधील FDR म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा विमानातील सर्व तांत्रिक माहिती नोंदवणारा महत्त्वाचा भाग असतो. विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती, पायलटचे नियंत्रण यासारखी अनेक संवेदनशील माहिती त्यामध्ये नोंदलेली असते. विमान अपघाताच्या चौकशीत या डेटाला अत्यंत महत्त्व असते.
रोहित पवार यांनी पुढे असा इशाराही दिला आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) किंवा विमान अपघात तपास संस्था (AAIB) मधील कोणीही अधिकारी या प्रक्रियेत मदत करत असेल तर फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा फेरफार उघड होऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केले की भविष्यात संसदेच्या माध्यमातून या प्रकरणाची स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट होणारच आहे. अशा वेळी व्हीएसआर कंपनीला कोणीही वाचवू शकणार नाही, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. दरम्यान, रोहित पवारांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तसेच विमान सुरक्षेशी संबंधित क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता या आरोपांवर संबंधित यंत्रणा आणि कंपनी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.