Advertisement
राज्य शासनास ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे आभाराचे पत्र
पुणे :राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, माध्यान्ह भोजन योजना, अंगणवाड्यांना १०० टक्के एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना तसेच माध्यन्ह भोजन बनविणाऱ्या बचत गटांना मोठा दिलासा मिळणार आहे, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले असून गॅस वितरणाचा दैनंदिन अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे, यासंदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राज्य शासनास दिले होते, सदर निर्णय घेण्यात आल्याने ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केंद्र तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
यासंदर्भात ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे शालेय पोषण आहार योजना अडचणीत येण्याची शक्यता होती. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना ही महिला बचत गटांमार्फत राबवली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. परंतु, पोषण आहार बनवण्यासाठी आवश्यक असलेला गॅस सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने या महिला चिंतेत होत्या. या पार्श्ववभूमीवर राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र गॅस कोटा निश्चित करावा, अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने केलेल्या सुचनेप्रमाणे प्राधान्यक्रमानुसार आता शैक्षणिक संस्था, माध्यन्ह भोजन योजाना, अनाथाश्रम यांना गरजेनुसार १०० टक्के गॅस सिलिंडर पुरवठा करण्याचे निर्देश दिले गेले आहेत, यामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळा आणि ग्रामीण भागातील अंगणवाड्यांत पोषण आहार शिजवताची अडचण दूर होणार आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राज्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही आभाराची निवेदने पाठविली असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
