#

Advertisement

Tuesday, March 17, 2026, March 17, 2026 WIB
Last Updated 2026-03-17T12:04:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवारांविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक लढणार ?

Advertisement

  • पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली 
  • धनगर समाज एवढा आक्रमक का झाला आहे 

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचालींमुळे धनगर समाज आणि सकल हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. अजित दादांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही,"अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदासंघाच्या जागेसाठी पोटनिवडणुक पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याने महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही उमेदवार दिला जाणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळेंबरोबरच 2025 ला अजित पवारांविरोधात लढलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली. कोणताही मोठा पक्ष सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसला तरी या ठिकाणी धनगर समाज मात्र निवडणूक बिनविरोध करण्याच्या विरोधात असून थेट सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवण्याची तयार करत आहे. अचानक धनगर समाज पवाराच्या बालेकिल्ल्यात पवारांच्याच घरातील सुनेच्या विरोधात का उभा राहिला आहे? सुनेत्रा पवारांविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक लढतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. एकीकडे अजित पवारांसंदर्भातील आदर आणि त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या सन्मानार्थ सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यासाठी कोणीही तयार नसताना धनगर समाज एवढा आक्रमक का झाला आहे?
बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत तेथील कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये बिनविरोधात निवडणूक लोकशाहीला मारक असल्याचंही हाके म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहे, असे हाके म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणे हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं, असे हाकेंनी म्हटले आहे. 

9 मार्चचा मोर्चा कशासाठी होता?
संपूर्ण धनगर समाज सुनेत्रा पवारांविरोधात आणि त्या माध्यमातून सत्ताधारी आघाडीच्या विरोधात उभं राहण्यामागे कारण ठरत आहे एक नामकरणाचा निर्णय. या निर्णयावरुन यापूर्वी बारामतीमध्ये आंदोलनही झाले आहे. मात्र आता या आंदोलनानंतर थेट मतपेटीमधून धनगर समाज आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे. बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाच्या नामकरणावरून ओबीसी तसेच धनगर समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी याच मुद्द्यावर 9 मार्च 2026 रोजी बारामतीत मोर्चा काढला आणि आंदोलन केले होते.