#

Advertisement

Tuesday, March 24, 2026, March 24, 2026 WIB
Last Updated 2026-03-24T14:55:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत कर्नाटकात गुन्हा दाखल

Advertisement

रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आले असून बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नागपुरात बस स्टॉपवरुन चार्जर चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला, ⁠चप्पल चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला. ⁠अंगणात झाडाच्या फांद्या आल्या म्हणून गुन्हा दाखल झाला, मात्र अजित दादांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही, ⁠ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असेही रोहित पवार यांनी म्हटले होते.
या प्रकरणी मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173(1) अंतर्गत ‘झिरो FIR’ म्हणून तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच 26 फेब्रुवारीला बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, FIR नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
24 फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात VSR कंपनीची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले असून, ती विमाने ग्राउंड करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त VT-SSK विमानाने सुमारे 4915 उड्डाण तास पूर्ण केले होते, जे 5000 तासांच्या अनिवार्य इंजिन ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ (TBO) मर्यादेच्या अत्यंत जवळ होते. तरीही कंपनीने व्यावसायिक वापरासाठी विमान चालू ठेवले होते, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास स्वतंत्रपणे आणि सखोलपणे करण्याची मागणी करण्यात आली असून, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या तांत्रिक चौकशीबरोबरच गुन्हेगारी तपासाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.