Advertisement
येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भक्तीचा महापूर ; तब्बल 15 लाखांहून अधिक भाविक दाखल
धाराशिव : जिल्ह्यातील येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भक्तीचा असा काही महापूर लोटला आहे की, त्यामुळे सोलापूर-धुळे हायवेवर चक्क 40 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी तब्बल 15 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली.
येडेश्वरी देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात साजरी केली जाते. यंदा 30 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत हा उत्सव सुरू आहे. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत. 15 लाखांहून अधिक जनसमुदाय एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने सोलापूर-धुळे या प्रमुख महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या अंतहीन रांगा लागल्या असून गाड्या अक्षरशः रेंगाळत पुढे सरकत आहेत. सुमारे 40 किलोमीटरपर्यंत हे जाम पसरल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे तासनतास जाममध्ये अडकलेल्या भाविकांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
प्रशासनाने भाविकांना आणि प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पर्यायी मार्गांचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
व्हीआयपींनाही बसला फटका
या महाजामचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनाही (VIP) बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे एक मोठे नेतेही या जाममध्ये अडकले होते. त्यांना या महामार्गावर तब्बल 2 तास 30 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. प्रशासनाकडून हा जाम सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असले, तरी भाविकांचा ओघ इतका मोठा आहे की परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी बराच वेळ लागत आहे.
