Advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली असून, सध्या तो कोठडीत आहे. त्याच्या आणि त्याच्याशी संबंधित इतरांच्या चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातचा संबंध राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेशी असल्याचेही अनेक दावे केले जात आहेत. अशोक खऱातने अजित पवारांच्या फोटोवर फुल्ली मारल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. तसेच याशिवाय शरद पवारांच्या फोटोवरही फुल्ली मारली होती, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, अजित पवारांच्या अपघाताआधी आणि नंतर खराच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले होते. अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी खरातला 17 मेसेज आले होते. इतकंच नाही तर त्यांनी पुढील 5 दिवसात आलेल्या मेसेजचाही आकडा सांगितला आहे. 27 जानेवारीला म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी 17 मेसेज आले होते. 28 जानेवारीला ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी 19, 29 जानेवारीला 10, 30 आणि 31 जानेवारीला प्रत्येकी 8 मेसेज आले होते असं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. पण हे मेसेज कुणी केले होते? समता नावाची पतसंस्था आहे, तिची सध्या चौकशी सुरु आहे त्यांनी हे मेसेज पाठवल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026, दरम्यान समताकडून अशोक खऱातला महिन्यात कधी एक, कधी सात असे मेसेज यायचे. पण या 5 दिवसात महिन्यात यायचे नाहीत तेवढे एका दिवसात मेसेज आले होते असंही त्यांनी सांगितले.एकूण मेसेजची संख्या पाहिली तर 5 दिवसात अशोक खरातला 62 मेसेज आले होते. हे काय झालं याची एसआयटीकडून चौकशी व्हावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
