Advertisement
ऍड. कामलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली भूमिका
पुणे : बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून दिवंगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरत आहेत. स्थानिक पातळीवर आणि पक्षीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही शक्यता धुळीस मिळाली आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असली तरी या निवडणुकीचा अपेक्षित निकाल सर्वांनाच माहित आहे, अशावेळी ही निवडणूक स्पर्धात्मक होण्यापेक्षा निवडणूक यंत्रणेवर येणार ताण आणि यावर होणार खर्च लक्षात घेता केवळ विरोधाला विरोध म्हणून अर्ज भरणाऱ्यांची भूमिका चुकीची वाटते, गेल्या काही दिवसांतील पवार कुटुंबियांसह राज्यावर ओढवलेले संकट पाहता सुनेत्रा पवार यांची निवड येथून बिनविरोध होणे हेच मला तरी अपेक्षित होते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) महिला उपाध्यक्षा ऍड. कामलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली आहे, तसेच शरद पवार साहेबांचे आदेश आले तर बारामतीत प्रचारात नक्की सहभागी होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामती पोटनिवडणुकीत विजयाच्या प्रबळ दावेदार असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अनेक अर्ज भरल्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण ताकदीने कामाला लागावे लागणार आहे. यात कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रणा, प्रचार नियंत्रण यांसारख्या विविध बाबींवर मोठा खर्च होणार आहे, त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांनी नेमका काय विचार केला, ही बाब सर्वांनाच विचार करायला लावणारी असल्याचे ऍड. कामलताई यांनी म्हटले आहे. काही राजकीय विश्लेषक आणि स्थानिक नागरिकांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर सार्वजनिक पैशांची बचत झाली असती. या सगळ्या घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणूक आता केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष लढतीकडे झुकत आहे. पुढील काही दिवसांत अर्जांची छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
