#

Advertisement

Tuesday, April 14, 2026, April 14, 2026 WIB
Last Updated 2026-04-14T15:18:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय...?

Advertisement

लक्ष्मणराव ढोबळे आणि बबनराव आवताडे यांची भेट 

पंढरपूर : मंगळवेढा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांतील हालचालींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. भगिरथ भालके यांच्यासह काही स्थानिक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या घडामोडीमुळे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांची चिंता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेनेच्या या नव्या प्रवेशांमुळे मतदारसंघात ताकद वाढवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत आहे.

दरम्यान, मंगळवेढा भागातही तिर्थक्षेत्र विकास आघाडीतील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर नवीन समीकरणे तयार होत आहेत. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कधीकाळी आमदार समाधान आवताडे यांचे समर्थक मानले जाणारे बबनराव आवताडे यांनी आपली एकनिष्ठ भूमिका कायम ठेवत कोणताही पक्षांतराचा निर्णय घेतलेला नाही. परंतु,नगरपरिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बबनराव आवताडे यांना मोठी मदत केली आहे, त्यामुळे आगामी काळातील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी बबनराव आवताडे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, भविष्यात एखादे नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, ही भेट केवळ औपचारिक नसून त्यामागे काही रणनीती असू शकते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, शिवसेनेत होत असलेले प्रवेश, भाजपची वाढती चिंता, बबनराव आवताडे यांची ठाम भूमिका आणि लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट या सर्व घडामोडींमुळे या मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले असून काहीतरी मोठं शिजतंय...अशीच चर्चा सध्या रंगू लागली आहे.