Advertisement
सोलापूर विभागाच्या सीपीडीएस पथकाची कारवाई
सोलापूर : मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या 'सिद्धेश्वर एक्सप्रेस'मध्ये प्रवाशांना लुटण्याचा मोठा कट रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) हाणून पाडला आहे. सोलापूर विभागाच्या सीपीडीएस (CPDS) पथकाने बुधवारी धाडसी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ संशयित महिलांना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर अटक केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यासाठी एक महिलांची टोळी सक्रिय झाली होती. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने विशेष पाळत ठेवली होती. संशयास्पद हालचाली दिसताच या नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, ही टोळी केवळ सोलापूरच नव्हे तर पुणे विभागातही अनेक रेल्वे गाड्यांमध्ये सक्रिय असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या टोळीचा मास्टरमाईंड कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी किती प्रवाशांना लुटले आहे, याचा शोध लोहमार्ग पोलीस घेत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे, याचाच फायदा घेऊन अशा टोळ्या सक्रिय होतात. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना आपले दागिने, मोबाईल आणि बॅगांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवासात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन 182 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
