#

Advertisement

Thursday, May 28, 2026, May 28, 2026 WIB
Last Updated 2026-05-28T13:02:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही : ४० उमेदवार ३ वर्षासाठी अपात्र

Advertisement

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडून आदेश जारी


पुणे : पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती व महापालिका निवडणुकांमधील पुणे महापालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ व ६ महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महापालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही.
पुणे महापालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे ५ व २५ मे २०२६ रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली. सदर सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपआयुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली आहे.