Advertisement
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
पुणे : शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चालना मिळणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याची तरतूद आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम केलेला असून या आकृतिबंधामध्ये प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत एक कला, एक क्रिडा व एक संगणक शिक्षक, अशी एकूण १ हजार ४९७ पदे मंजूर करण्यात आली असून कंत्राटी पद्धतीने घेण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
शिक्षकांच्या नेमणूका या करार पद्धतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात याव्यात, त्यानंतर आवश्यकतेनुसार करारनाम्याची मुदत पुन्हा ११ महिन्यांनी वाढवावी, अशी सूचना आहे. जास्तीत जास्त तीन वेळा सदर नियुक्ती करता येणार आहे. त्यानंतर अशा उमेदवारांची पुन्हा नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असल्यास त्या उमेदवारास पुन्हा निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षा करीता ८४० कला, क्रिडा व संगणक शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस मान्यता देण्यात आली होती. आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता १८७ कला शिक्षक, २४२ क्रिडा शिक्षक, १६८ संगणक शिक्षक अशा एकुण ५९७ कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार आहे.
