Advertisement
गुलाबराव पाटलांना गिरीश महाजनांनी डिवचलं
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त असलेल्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमधील दोन बडे नेते म्हणजेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील हे त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मुंबईत फिल्डिंग लावत असतानाच, गिरीश महाजन यांनी "गुलाबराव मुंबईला जात असतील तर मी देखील तातडीने दिल्लीला जात आहे," असा खोचक टोला लगावला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगितला आहे. "या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे. जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल," अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
गुलाबराव पाटलांच्या दाव्यावर गिरीश महाजन यांनी भाजपची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. "गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेची जागा ही भाजपचीच आहे. आम्ही वर्षानुवर्षे ही जागा लढवत आलो आहोत आणि जिंकतही आलो आहोत. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. सध्या भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 10 जण इच्छुक आहेत," असा थेट दावा महाजन यांनी केला. तर, जळगावमध्ये महायुतीत ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे आम्ही काम करू, अशी प्रतिक्रिया देखील गिरीश महाजन यांनी दिली आहे.
