Advertisement
संपूर्ण सरकारी यंत्रणा लागली कामाला : सुषमा अंधारे यांचा आरोप
मुंबई : भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आणि दमदाटीचे आरोप केले असताना आता, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट करत उद्योग मंत्री उदय सामंत यांचं आणि त्यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांचं नाव घेत अत्यंत खळबळजनक आरोप केला. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री सामंत यांच्या पत्नी नीलम यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे, असे सुषमा अंधारे म्हटले आहे. तसेच, भाजपकडून दडपशाही केली जाते, याचं उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे, असं म्हणत खासदार सुप्रीया सुळे यांनीही या निवडणुकीवरुन थेट भाजपवर आरोप केला आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. एका मंत्र्याची बायको चित्रपट महामंडळाची निवडणूक लढतेय, मंत्र्यांचा ओएसडी फोन करून धमकावत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच, रोहित पवार यांनीही या निवडणुकीत सुरू असलेल्या धुसफुसीवरुन इशारा दिला आहे. कलाक्षेत्रातील लोकांचा आवाज दाबला जात असले तर आम्ही त्या विरोधात रस्त्यावर उतरू, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
