Advertisement
60 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पालिकेच्या 2800 कोटींच्या ठेवीतील व्याजात ही जैन यांनी घोटाळा केल्याचे आणि सात कोटींचा डल्ला मारल्याचे समोर आले आहे. आधीच्या साठ कोटींच्या घोटाळ्यात सुरु असलेल्या चौकशीत हे उघड झाले आहे. पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाने जैन यांचा नवा कारनामा समोर आला आहे.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांचा यात हात आहे का? याचे संशोधन करण्याची गरज आहे. असे म्हणत स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी शंका उपस्थित केली आहे. कारण त्यांच्या काळातील 2024 साली 1810 कोटींच्या तर 2025 साली सुमारे 1 हजार कोटींच्या ठेवी ठेवताना, बँकांशी तडजोड करुन जैन यांनी व्याजातून सात कोटी लाटले. हे चौकशी अहवालातून स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप बारणेंनी केला आहे. सध्या हा अहवाल अर्धवट आहे, आम्ही सुधारित अहवालाची मागणी करीत आहोत. त्यानंतर घोटाळ्याचा आकडा आणखी वाढणार आहे. असा दावा बारणेंनी केला आहे. अशातच, आता पालिकेच्या तिजोरीला बसलेला भुर्दंड जैन यांच्याकडून वसुल करावा, अशी मागणी ही बारणेंनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादीनं उडी घेतली आहे. ठेकेदारांना ज्या उपसुचनांच्या आधारे बिलं अदा करण्यात आली, त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एकही नगरसेवकांची सही नाही, असा दावा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या सह्यांनी बिलं अदा झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर पलटवार केला. या भ्रष्टाचारात भाजपचा हात आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे.
