Advertisement
महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी रिंगणात
सोलपूर : भाजपचे राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापुरातून 616 पैकी मला 550 मतं मिळतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. कोण कुठल्याही पक्षात असले तरी माझे सर्वांशी संबंध असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पंढरपूर येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीसाठी राऊत आले असता ते माध्यमांशी बोलत होते. सोलापूर विधान परिषद जागेसाठी भाजपचे मावळते आमदार प्रशांत परिचारक इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना डावलून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्याने परिचारक समर्थक नाराज झाले आहेत. यामुळेच आज राऊत यांनी पंढरपुरात येऊन परिचारक समर्थक असणाऱ्या सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संवाद साधत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे उत्तमराव जानकर यांनी देशमुख यांना मतदान करणार नसल्याची घोषणा केली होती. यानंतर आज राऊत यांनी माझे सर्वच पक्षात मैत्रीचे संबंध असून मदत करणाऱ्या प्रत्येकाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत एकूण 616 मतापैकी मला साडेपाचशे मतं मिळतील असा मोठा दावाही राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान पार पडणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
