Advertisement
माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी शासनाकडून व्यक्त केली अपेक्षा
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी शिरशी-मंगुड गावचा मल्ल महेंद्र गायकवाड हिंद केसरी झाला. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून त्याला घोषित करण्यात आल्यानंतर आमच्या मल्लाने थोपटलेला दंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकू जाईल आणि आमच्या जिल्हाचा पैलवान डिवायएसपी (पोलीस उपअधीक्षक) हाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली.
सातार्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हिंद केसरी किताबासाठी झालेल्या लढतील सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली. प्रतिष्ठेची हिंद केसरी गदा पटकावली, याचे कौतूक करताना प्रा.डॉ.ढोबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चांदीचे कडे आणि रोख रक्कम देवून लक्ष्मण ढोबळे यांनी हिंद केसरी महेंद्र गायकवाड याचा सन्मान केला. ते म्हणाले की, अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष करताना उपांत्य फेरीत महेंद्र याने आणि दिल्लीच्या अनिरुद्ध याला गुडघ्यावर आणले. चुरशीची लढत देत महेंद्र आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर दिल्लीच्या अनिरुद्धला चितपट करीत मोठ्या थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला तेंव्हाच आमच्या जिल्ह्याचा मल्ल हिंद केसरी होणार, असा विश्वास वाटला. आता, राज्य शासनाने त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून त्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्याला शासनाने पोलीस खात्यात वरच्या पदावर स्थान देत हिंद केसरी किताबाचाही मान राज्य शासनाने राखावा, असे ढोबळे यांनी स्पष्ट नमूद केले.
खरं तर, पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं, मंगळवेढा दाण्याचं अशी म्हण आहे तसेच आता शिरशी-मंगुड पैलवानाचे म्हणावे लागेल, असे जागतीक यश महेंद्र याने मिळवले आहे. मंगळवेढा तालुका संतांचा तसाच तो तालमींचा म्हणूनही ओळखला जातो. मारुती वाकडे, सिताराम लांडे, राजेंद्र ओमने, दामु मंडले, मुरलीधर सरकळे, ज्ञानेश्वर भगरे अशा मल्लांनी हा कुस्तीचा वारसा जपला. मारुती बापू वाकडे लहान पोरांना गोळा करायचे आणि तालमीत घडवायचे, त्यातील कोणी ऐकीरादेवीच्या माळावर मैदान मारले की धन्यता मानायचे. घरात दोन पोरं असतील तर एकाला शाळेत आणि दुसर्याला पैलवान करायचे, अशी मंगळवेढ्याची जुनी परंपरा आहे. अर्थात पैलवानाने नेहमीच दुबळ्याला संरक्षण दिले पाहिजे, हा त्यामागील हेतू असतो. शिरशी सारख्या पाणी नसलेल्या गावात जन्माला येवून मेहनतीवर पुणे, पिंपरी-चिंचवडची मैदानं गाजवत हिंद केसरी होणारा महेंद्र गायकवाड राज्याने, देशाने पाहिला याचा आम्हाला अभिमान आहे. भाकरीला पाणी लावण्यासाठी देखील ज्या गावात पाणी नसते त्या गावाच्या माऊलीने जेवणचा डबा तयार करीत पुण्यापर्यंत पोहोचवला, अशा आईने दोन घास कमी जेवत या पैलवान पोराची काळजी घेतली, आई-वडीलांचाही महेंद्र याच्या यशात मोठा वाटा म्हणावा लागेल, असेही प्रा. डॉ. ढोबळे यांनी नमूद केले.

