Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दोघांचे अर्ज, भाजपच्या प्रदीप कंद यांची बंडखोरी?
पुणे : पुणे विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, पक्ष कार्यालयात बसूनच नुकतेच भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनिल टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्यातच, महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली असली तरीही भाजपच्या प्रदीप कंद यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यातून अंतिम उमेदवारीसाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राष्ट्रवादीतील या नाराजी नाट्यावर आता जय पवार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे.
पुणे विधानपरिषदेसाठी महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याआधीच शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी देखील अर्ज दाखल केला आहे, त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून पुणे विधानपरिषदेसाठी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
महायुती उमेदवारी दिली असून वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे, कार्यकर्ते म्हणून आम्ही आहोत. वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे, तो आम्ही मान्य केला. मी सगळ्यांसोबत असतो, कोणीही लोक नाराज असतील तर त्यांना भेटून नाराजी दूर करू, असे जय पवार यांनी पुण्यातील नाराजीनाट्यवर बोलताना म्हटले. आमची सगळ्यांची इच्छा आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असेही जय पवार यांनी म्हटले आहे. तर, विधानपरिषद जागेसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विक्रम काकडे यांची उमेदवारी सर्व नेत्यांनी ठरवली आहे, एकत्रितपणाने चर्चा करुन त्यांना ही उमेदवारी दिली आहे असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे, असे भाजप नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
