Advertisement
अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद : भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा
सोलापूर : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसला मोठा आणि मानहानीकारक धक्का बसला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर छाननीदरम्यान अवैध ठरवून बाद करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कायदेशीर पडताळणीनंतर हा मोठा निर्णय दिला आहे.
काँग्रेसकडून सूचक म्हणून अर्ज केलेल्या व्यक्तीनेच घेतलेल्या हरकतीमुळे पक्षाच्या उमेदवारावर ही नामुष्की ओढावली आहे. यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे. मित्र समजून ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्याने केसाने गळा कापला, अशी प्रतिक्रिया देताना काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर भावूक झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे राजेंद्र राऊत, शरद पवार राष्ट्रवादीकडून वसंत देशमुख, नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, धनंजय डिकोळे, महेश साठे, रमेश बारसकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
