Advertisement
शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही शिवभक्तांसाठी नियोजन
रायगड : दुर्गराज रायगडावर शनिवारी (ता. ६ जून) होणाऱ्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिवभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि प्रशासनाने पूर्व तयारी केली आहे. दुर्गराज रायगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी आणि शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जात आहे, यावर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्यात येत असून याला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे संस्थेच्या संचालिका तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
रायगडावर शनिवारी (ता. ६ जून) शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे, या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ने त्यांच्याशी संवाद साधला असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्रशासन आणि समितीच्या समन्वयातून हा सोहळा उत्साहात पार पाडण्याची नियोजन करण्यात आले असून यामध्ये शाहु शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्यात आला आहे. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यासाठी तब्बल 40 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. गडावर वाढणारी शिवप्रेमींची गर्दी लक्षात घेता पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मार्गदर्शन केंद्र आणि सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
शुक्रवार, 5 जून 2026 (पहिले सत्र) :
दुपारी 3:30 - पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेब यांच्या समाधीस अभिवादन.
दुपारी 4.00 - संभाजीराजे व शहाजीराजे यांच्याकडून पायी गड चढण्यास सुरुवात.
दुपारी 4.15 - नगारखाना येथे समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत गडपूजन.
दुपारी 4.30 - संयोगीताराजे यांच्या हस्ते ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे भव्य उद्घाटन.
रात्री 8.00 - राजसदर येथे ‘जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहिरी कार्यक्रम.
रात्री 9.00 - शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा पारंपारिक गोंधळ.
रात्री 9.30 - जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.
शनिवार, 6 जून 2026 (मुख्य सोहळा):
सकाळी 7.00 - नगारखाना येथे शहाजीराजे यांच्या हस्ते विधीवत ध्वजारोहण.
सकाळी 9.30 - शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदर येथे भव्य आगमन.
सकाळी 10.00 - संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीस मुख्य अभिषेक, तसेच राजसदरवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा जयघोषात अभिषेक.
सकाळी 10.20 - युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे देश-विदेशातून आलेल्या शिवभक्तांना जाहीर संबोधन.
सकाळी 10.30 - ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ या मुख्य पालखी सोहळ्यास सुरुवात.
सकाळी 11 ते 12 - शिवछत्रपतींच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन.
दुपारी 12.15 - जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाला आषाढी पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान.
दुपारी 12:25 - शिवछत्रपतींच्या पवित्र समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
