Advertisement
नसरापूर प्रकरणाच्या निकालानंतर ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची मागणी
पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटनेचा निकाल आज लागला. नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा नराधम आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज (गुरुवार, 25 जून) दोषी घोषित केले. या जलद निकालामुळे पीडित कुटुंबाला कायदेशीर दिलासा मिळाला आहे, याबद्दल असंवेदन सरकारचे आभार मानते. मात्र, अद्यापही राज्यात महिला सुरक्षित नाही. अत्याचाराच्या शेकडो केसेस पेंडिंग असून त्या ही लवकरात लवकर निकाली काढा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केली आहे.
महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 नसरापूर परिसराला हादरवून टाकणारी एक घटना उघडकीस आली होती. अवघ्या साडेतीन वर्षांच्या एका निष्पाप बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून करण्यात आला. या अमानुष घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरात उमटले होते. जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत होता आणि नराधम आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती.
या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कोमल साळुंखे-ढोबळे यांनी सरकारवर निशाणा साधत भावना व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना कोमल साळुंखे यांनी, हे सरकार बलात्काऱ्याला पोसणारं सरकार आहे, अशी तिखट टीका केली होती. घटना घडलेल्या तारखेपासून आजपर्यंत अवघ्या 55 दिवसांत हा निकाल लागला असला तरी केवळ एका केसपुरते मर्यादित राहून चालणार नाही. आजही राज्यात महिलांवर आणि लहान मुलींवर होणारे अन्याय-अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. न्यायालयांमध्ये अशा अनेक केसेस आजही प्रलंबित आहेत. सरकारने केवळ या एकाच प्रकरणापुरती तत्परता न दाखवता, इतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निकालही असाच जलद गतीने लावावा, जेणेकरुन पीडितांच्या कुटुंबांना वेळेत न्याय मिळेल आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नसरापूर प्रकरणातील जलद निकाल हा कायदेव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्यावरून सरकारवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता न्यायालय आरोपी भीमराव कांबळेला काय शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
