#

Advertisement

Saturday, June 27, 2026, June 27, 2026 WIB
Last Updated 2026-06-27T12:49:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

टीईटी परीक्षेतील गैरप्रकार थांबवा ; शिक्षक भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवा

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची मागणी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर भिवंडी येथे फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या या महत्त्वाच्या परीक्षेतच वारंवार गैरप्रकार होत असतील, तर भविष्यात गुणवत्तापूर्ण, आदर्श आणि प्रामाणिक शिक्षक कसे घडणार, असा गंभीर सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी उपस्थित केला आहे.

टीईटी परीक्षा ही केवळ एक स्पर्धा परीक्षा नसून राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचा पाया आहे. शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक कार्यरत शिक्षकांनाही सेवा कायम ठेवण्यासाठी अथवा नियमांनुसार पात्रता सिद्ध करण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राहणे अत्यंत गरजेचे आहे.

यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून विक्रमी प्रतिसाद मिळाला होता. परीक्षेसाठी तब्बल ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर-१ आणि पेपर-२ मिळून ६ लाख १२५ अर्ज दाखल झाले होते. विशेष म्हणजे २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांनी देखील या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार या परीक्षेत सहभागी होत असताना पेपर फुटल्याची घटना समोर येणे अत्यंत चिंताजनक असून लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या भविष्याशी खेळ करणारे आहे, असेही  ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटले आहे.

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटले आहे की, शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकांच्या निवडीची प्रक्रिया जर संशयाच्या भोवऱ्यात सापडत असेल, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल. मेहनत घेऊन प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर हा अन्याय असून अशा घटनांमुळे गुणवत्तेपेक्षा गैरमार्गाने यश मिळविण्याची प्रवृत्ती वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेतील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांमागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा, परीक्षा केंद्रांवरील कडक देखरेख आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारने टीईटी परीक्षेची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखविता कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिक्षक घडविण्याच्या पहिल्याच टप्प्यावर भ्रष्टाचाराला आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले, तर त्याचा परिणाम पुढील अनेक पिढ्यांच्या शिक्षणावर होईल, असेही ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.

टीईटी परीक्षेत सतत गैरप्रकार

टीईटी परीक्षेबाबत गैरप्रकारांची ही पहिली घटना नाही. मागील काही वर्षांपासून सातत्याने विविध प्रकारचे घोटाळे आणि अनियमितता समोर येत आहेत. २०१९ च्या टीईटी परीक्षेत ७ हजार ८७४ उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग आढळून आला होता. त्यापूर्वी २०१८ च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. या दोन्ही घटनांमध्ये मिळून ९ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा संपादणूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेदरम्यान मुरगुड पोलीस ठाण्यात परीक्षेतील गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात २२ उमेदवारांची परीक्षा संपादणूक रद्द करण्यात आली होती. आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडल्याने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि सुरक्षेतील गंभीर निष्काळजीपणा पुन्हा अधोरेखित झाला आहे.