#

Advertisement

Friday, July 3, 2026, July 03, 2026 WIB
Last Updated 2026-07-03T12:00:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"ईठा"चा दमदार टीझर रिलीज...

Advertisement

श्रद्धा कपूरची तुफान एंट्री चर्चेत 

पुणे: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाशी संबंधित काही दृश्ये सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता अधिकृत टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हा चित्रपट तमाशासम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची, कलेप्रती असलेल्या निष्ठेची आणि तमाशा क्षेत्रातील योगदानाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. टीझरची सुरुवात तमाशाच्या रंगमंचावरील वातावरणाने होते. प्रेक्षकांमधून “ईठा कुठेय? ईठाला बोलवा” अशी हाक ऐकू येते. दुसरीकडे, प्रसूती वेदना सहन करत असतानाही ईठा रंगमंचावर जाण्याची तयारी करताना दिसते. मुलाला जन्म दिल्यानंतरही ती कार्यक्रमासाठी तयार होण्याचा निर्धार व्यक्त करते. त्यानंतर तिची रंगमंचावरील दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. टीझरमधील “पडून मेले तर लोक मला बेचारी म्हणतील, पण नाचता नाचता मेले तर आदर्श बनेन” हा संवाद विशेष चर्चेत आला आहे. श्रद्धा कपूरचा अभिनय, तिचे हावभाव आणि लावणी सादरीकरणाची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी श्रद्धा कपूरच्या या भूमिकेचे कौतुक केले असून हा तिच्या कारकिर्दीतील वेगळा आणि आव्हानात्मक सिनेमा ठरेल, असे मत व्यक्त केले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ईठा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून सध्या त्याच्या टीझरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.