Advertisement
अमोल कोल्हेंचं 'ऑपरेशन तुतारी'वर मोठं भाष्य
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळे आणि भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'इन्फ्रामॅन' असल्याचं म्हटलं होतं. तसेच सत्ताधाऱ्यांकडून ऑफर आल्यास विचार करू, असे विधान केल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असेही स्पष्ट केले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, "काल मी पत्रकारांशी बोलत असताना एका पत्रकाराने मला विचारलं की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपमध्ये गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का? पुणे नाशिक रेल्वे संदर्भात सातत्याने मागणी आहे की, जी ओरिजनल अलाइनमेंट होती यावरच पुणे नाशिक रेल्वे व्हावी. पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपमध्ये गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का? यावर माझा त्यांना प्रतिप्रश्न होता की अशी काही ऑफर आहे का? जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर विचार करू. हे रेल्वेच्या संदर्भात असणारे विधान होते. या विधानाला वेगळा अर्थ काढण्याचा काही जणांनी प्रयत्न केला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे आणि एकत्रच राहील. आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. सुप्रिया सुळे या आमच्या गटनेत्या आहेत. आमचे सर्व खासदार एकत्र आहेत, या चर्चा काय सुरू आहेत त्याची मला कल्पना नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो. मी कुठेही जाणार नाही, यावर मी मत व्यक्त केले आहे, असे देखील त्यांनी म्हटले.
