Advertisement
अनुसूचित जाती समाजबांधव २९ सप्टेंबरला मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढणार
लातूर : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचा लाभ सर्व समाजघटकांपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात आणि समानपणे पोहोचावा, यासाठी अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोमवारी लातूर शहरात अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींसह हजारो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला. यामध्ये समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या मार्चाचे नेतृत्त्व केले. हजारो समाजबाधवांना लक्ष्मणराव ढोबळे यांची उपस्थिती मोठे बळ देऊन गेली.
लातूर मधील स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्यासह हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचला. तेथे आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तयार करण्यात आलेले निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
मोर्चाला संबोधित करताना विविध वक्त्यांनी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय कोणताही विलंब न करता लागू करावा, अशी ठाम मागणी केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक वंचित समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा लढा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून, अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांना संविधानाने दिलेले हक्क आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने सुरू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. तसेच, येत्या २९ सप्टेंबर रोजी मुंबईकडे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
