#

Advertisement

Wednesday, July 8, 2026, July 08, 2026 WIB
Last Updated 2026-07-08T17:38:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुकाराम मुंढेंचा दणका ! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Advertisement

मुंबई : आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. एफडीएच्या पथकाने एकाच दिवशी तब्बल 16 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक छापेमारी (Raids) केली. या धडक कारवाईत मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम' दुकानाला मोठा दणका देत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. या मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि अन्न उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. एकाच दिवसात झालेल्या या मोठ्या कारवाईत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.
नरिमन पॉईंट येथील 'रुस्तम अँड कंपनी' हे मुंबईतील ग्राहकांचे आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते आणि जुने आईस्क्रीम केंद्र मानले जाते. मात्र, एफडीएच्या पथकाने जेव्हा या ठिकाणी तपासणी केली, तेव्हा तिथली दुरवस्था पाहून अधिकारीही चक्रावले. दुकानात स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले होते. तिथे जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून आला. आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन ऑपरेशन्स' खंडित अवस्थेत होती. दुकानात मुदत संपलेले (अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. नियमानुसार आवश्यक असलेले अनिवार्य रेकॉर्ड दुकानात ठेवण्यात आले नव्हते. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने 'अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006' च्या कलम 32 (3) अंतर्गत रुस्तम आईस्क्रीमचा परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएने केवळ मुंबईतच नव्हे, तर राज्यभरात ही मोहीम राबवली आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक नव्हे, तर फौजदारी कारवाई देखील करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान राज्यभरातून तब्बल 9 लाख 60 हजार 416 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या बेकायदेशीर विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी FIR नोंदवण्यात आला असून, एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. "नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही; हॉटेल्स आणि अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा यापुढील काळात याहूनही कडक कारवाई केली जाईल," असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.