Advertisement
रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्रे देण्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप समोर आला असून, एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
महेश कदम हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर आणि त्यांच्या अन्य काही साथीदारांनी त्यांना तब्बल ३ लाख रुपयांत बीकॉमची पदवी मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर कदम यांना बीकॉमचे पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र प्रमाणपत्रावर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ ऐवजी ‘युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असे नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याशिवाय वेगवेगळ्या वर्षांची चार पदवी प्रमाणपत्रे देण्यात आल्याने त्यांचा संशय अधिकच बळावला. यानंतर महेश कदम यांनी हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या तक्रारीनंतरही तात्काळ कारवाई झाली नाही. जवळपास महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. सध्या रमेश मुखेकर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
