Advertisement
मंगळवेढा : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा विस्तार करत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उप प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्वागत करत, हा निर्णय आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे केलेल्या उपोषण आंदोलनाच्या यशाचे फलित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्यामुळे सरकारला हा सकारात्मक निर्णय घ्यावा लागला.
ॲड. कोमलताई म्हणाल्या की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा विस्तार करून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करणे हा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्याने उभारी मिळेल. कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झाल्यानंतर शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेतीकडे वळू शकतील आणि कृषी उत्पादनातही सकारात्मक वाढ होईल.
ॲड. साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून, भविष्यातही शेती आणि शेतकरी हिताचे असेच निर्णय सातत्याने घेतले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ॲड. कोमलताई यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ कर्जमाफीपुरते मर्यादित नसून शेतीमालाला हमीभाव, सिंचन सुविधा, पीकविमा, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, वीजपुरवठा आणि बाजारपेठेची उपलब्धता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही शासनाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, अशी ग्वाही देताना ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाल्याचे सांगितले. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, याचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तातडीने आणि पारदर्शकपणे पोहोचावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केलेल्या उपोषण आंदोलनात स्वत: ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याही सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
