Advertisement
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही खासदार फुटतील अशी चर्चा सुरू असताना मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये फूट पडणार नाही, ऑपरेशन तुतारीला सध्या ब्रेक लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार फुटतील अशी चर्चा होती.
शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यात यश मिळवलं. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांवर आहे, अशी चर्चा सुरू झाली. आगामी अधिवेशनात संसदेमध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहती आहे. त्यामुळेच शरद पवारांकडे असलेल्या खासदार फोडण्यात येतील अशी चर्चा होती. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटणार नाहीत, शिवसेनेला त्यांचे खासदार फोडण्यात काही रस नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
