Advertisement
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा
सोलापूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे, याकरिता 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या नव्या नियमाचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्याने व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं चित्र बघायला मिळाले. दरम्यान याच व्हीआयपी दर्शनाबाबतच्या वास्तवांमुळे प्रशासन ॲक्टिव मोडवर आले आहे. व्हीआयपी दर्शन घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिके एन यांनी दिला आहे.
प्रोटोकॉल नुसार राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना व्हीआयपी दर्शन घेता येईल. मात्र यावेळी त्यांच्यासोबत दोन किंवा तीन लोकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. मंत्री आणि आमदारांच्या सोबत असणारा लवाजमा मंदिरात सोडला जाणार नसल्याचा खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंदी (15 जुलै) लागू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी थोडा गोंधळ झाल्याची कबुली देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आता यापुढे अतिशय कठोरपणे व्हीआयपी दर्शन बंदीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.
