Advertisement
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सुरू केलेल्या आंदोलनानंतर राजधानीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. जंतर-मंतर ते संसद भवन या मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही सहभागी झाले होते.यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “मोदींची हुकूमशाही चालणार नाही”, “मोदी हाय हाय”, “अमित शाह हाय हाय” अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध केला. “हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे या विषयावर चर्चेची मागणी केली होती. विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. काल घडलेल्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप माफी मागितलेली नाही,” अशी टीका त्यांनी केली.
