#

Advertisement

Friday, August 21, 2026, August 21, 2026 WIB
Last Updated 2026-08-21T17:00:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कवितेने समाजातील वास्तव आणि मानवी संवेदना प्रभावीपणे मांडाव्यात : प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement

 

तुळजाभवानी महाविद्यालयात 'श्रावणसरी' राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात  

तुळजापूर : कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती मानवी मनातील भावना, संवेदना, संघर्ष आणि सामाजिक वास्तव व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. कवीने आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सकारात्मक विचारांची पेरणी केली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा श्री शाहू शिक्षण संस्था, पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे बुधवारी (ता. १९) 'श्रावणसरी' राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनपर अभिभाषणात प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते. ते म्हणाले की, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत साहित्याची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी नव्या पिढीने वाचन, चिंतन आणि लेखनाची आवड जोपासावी, असे आवाहन केले. कविता ही समाजमनाला जागृत करणारी  आणि माणसाला माणसाशी जोडणारी शक्ती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी या काव्य संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयप्रकाश पाटील, मुख्याध्यापक, म. वि. रा. शिंदे प्रशाला, तुळजापूर तथा मराठवाडा विभाग प्रमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. कौस्तुभ गवाडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी योगीराज माने (लातूर) यांनी भूमिका बजावली. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी योगीराज माने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून समकालीन कवितेचे स्वरूप, कवीची सामाजिक बांधिलकी आणि बदलत्या काळातील साहित्यिक अभिव्यक्ती याविषयी विचार मांडले. विविध विषयांवरील कविता रसिकांसमोर सादर करत त्यांनी संमेलनाला विशेष रंगत आणली.
या राज्यस्तरीय काव्य संमेलनात हनुमंत पडवळ (धाराशिव), डॉ. शिवाजी शिंदे (सोलापूर), शेखर गिरी (कळंब), डॉ. मधुकर हुंजरे (धाराशिव), पूजा भंडारे (पुणे), मनीषा पोतदार (धाराशिव), वंदना कुलकर्णी (सोलापूर) आणि डॉ. अरविंद हेंगरेकर (धाराशिव) या निमंत्रित कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. कवी-कवयित्रींनी निसर्ग, पाऊस, प्रेम, माणुसकी, सामाजिक वास्तव, शेतकरी जीवन, स्त्रीसंवेदना, पर्यावरण, बदलते जीवनमान आणि समकालीन सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवरील कविता सादर केल्या. भावस्पर्शी आणि आशयघन कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
'श्रावणसरी' राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या माध्यमातून तुळजाभवानी महाविद्यालयाने मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. राज्यातील विविध भागांतील कवी-कवयित्रींचा सहभाग आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संमेलन संस्मरणीय ठरले. सदर काव्य संमेलन हे संमेलनाचे संयोजक प्रा. ज्योतिर्लिंग शिरसागर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जीवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.