Advertisement
लक्ष्मण हाकेंचा दावा ; सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचेही घेतले नाव
पुणे : महाराष्ट्रातील जी काही मोठी नेते घराणी आहेत त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात. सगेसोयऱ्याचा त्यांचा आग्रह आहे ना? पण अजून एक सांगतो तुम्हाला, सदानंद सुळे जरी ब्राह्मण असले, तरी ब्राह्मणाचं पण कुणब्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. मोडी लिपीचं ट्रान्सलेशन करायचं आहे आणि तो दाखला घेऊन यायचा आहे, संपला विषय. त्यामुळे ब्राह्मण पण... मराठा जर ओबीसीमध्ये येऊ शकत असेल तर ब्राह्मण पण येऊ शकतो, जैन पण येऊ शकतो. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही मला माहिती नाही, पण सुप्रिया सुळे इकडून पण कुणबी म्हणजे ओबीसी होऊ शकतात आणि सदानंद सुळे यांच्याकडून पण होऊ शकतात. आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे ही माझी पक्की माहिती आहे. अजून कोणत्या नेत्यांकडे आहे असं तुम्हाला माहिती आहे? यावर लक्ष्मण हाके म्हणाले, खूप नेते आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पोरांकडे, विक्रम शिंदे आणि रणजित शिंदे, आमच्या पंढरपूरच्या भालकेंकडे आहे, आवताडेंकडे आहे, आमच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारांकडे आहे. मग अहिल्यानगर जिल्ह्यातले कर्डिले असतील, गाडे असतील किंवा मग अंबादास दानवे असतील, किंवा किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला? अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट आहे. या सामाजिक न्यायाच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामधल्या आमदार, खासदार, मंत्री पदावर ज्यांची नेहमी मक्तेदारी आहे, या माणसांकडे जर मागासवर्गीयांचं सर्टिफिकेट असेल, तर यांच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातला ओबीसी टिकेल का? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे.
