Advertisement
दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट
पुणे : रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेल्या या सणाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत गेले होते. मात्र, राजकारणापलीकडे दोघांमधील भाऊ-बहिणीचे नाते आणि कौटुंबिक जिव्हाळा कायम चर्चेत राहिला. अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर उतरत असताना झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भावना व्यक्त केल्या. “आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणे, एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांविषयी वाटणारा अभिमान याच गोष्टींमुळे आपल्या नात्याला बळ मिळाले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाला सात महिने उलटले असले तरी त्या घटनेवर अद्याप विश्वास बसत नसल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
“आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील,” असे म्हणत त्यांनी भावाच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. तसेच अजित पवार जिथे कुठे असतील, तिथून त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावेत, अशी भावनिक प्रार्थनाही त्यांनी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी केलेली ही पोस्ट भावंडांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची आणि अजित पवार यांच्या आठवणींची भावूक झलक दाखवणारी ठरली.
