#

Advertisement

Wednesday, August 19, 2026, August 19, 2026 WIB
Last Updated 2026-08-19T14:58:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

Advertisement

 

धाराशिव : जिल्ह्यातून निवासी शाळेतील अनास्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे असलेल्या दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून, संस्थाचालक आणि शाळा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर नरकयातना सहन करण्याची वेळ आली आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असतानाही या शाळेत अत्यंत बिकट आणि असुरक्षित वातावरणात दिव्यांग विद्यार्थ्यांना ठेवले जात असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे.
शाळेतील परिस्थिती अत्यंत विदारक असून विद्यार्थ्यांचे अन्नधान्य आणि जेवणाचे साहित्य जनावरांच्या गोठ्यात ठेवण्यात आले आहे. तेथे चौफेर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या वर्गखोल्यांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्याच खोल्यांमध्ये सिमेंटची पोती, शाळेची रद्दी आणि टाकाऊ साहित्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय, वर्गखोल्यांचे छत गळके असून अत्यंत अडचणीच्या आणि अस्वच्छ वातावरणात हे विद्यार्थी राहण्यास आणि शिकण्यास मजबूर आहेत.
काही दिवसांपूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात पुरेशी अन्नाची सोय नसल्याचा आणि मुले उपाशी असल्याचा प्रकार समोर आला होता. या दिव्यांग मुलांच्या हालअपेष्टांचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी 'एबीपी माझा'ने प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी केली असता, हे सर्व धक्कादायक आणि विदारक प्रकार कॅमेऱ्यासमोर उघड झाले.
या संपूर्ण गंभीर प्रकारावर जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. संबंधित शाळा प्रशासन आणि संस्थाचालकांवर कारवाई करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन समाज कल्याण विभागाने दिले आहे.