Advertisement
रोहित पवारांचा हल्लाबोल
पुणे : या सरकारमध्ये इतके नग आहेत की 'ऑनलाईन पेपर फुटतात म्हणून ऑफलाईन घेऊ' म्हणतात, पण ऑफलाईनमध्येही घोटाळे होतात. आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको, आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात ऑफलाईन परीक्षा पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी आज केली. एमपीएससीकडून ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पेपर रद्द करण्यात आला. रोहित पवार यांनी आज पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट आभार मानले. यावेळी रोहित पवार यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांची आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली.
रोहित पवार म्हणाले की, एमपीएससीचे अध्यक्ष हे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. आरटीओ कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मग असा गोंधळ घालणारा अधिकारी जर तुम्ही एमपीएससीचा अध्यक्ष बनवत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. नैतिक जबाबदारी घेऊन या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे. या महिन्याअखेरपर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही, तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता आम्ही एमपीएससीच्या कार्यालयावर जाणार. तिथे जाणाऱ्या अध्यक्षाला आणि सचिवाला भेटून जाब विचारणार असल्याचा अल्टीमेटम त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी सांगितले की, 2023 पासून बघितलं तर मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक, वन संरक्षण, तलाठी भरती, महाजनको, कोतवाल भरती, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याचे पेपर फुटले. तलाठी भरतीमध्ये 40 लाखाला एक एक पेपर गेला. सुमारे 4 हजार कोटींचा भ्रष्टाचार याच्यात झाला होता. जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, एसएससी केमिस्ट्री, एफडीए, एसआरपीएफ, नीट (NEET) आणि सीईटी परीक्षा या सगळ्यामध्ये गोंधळ व घोटाळे झाले आहेत. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार एमपीएससीचे ३ अधिकारी या पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत. एक क्लासवाले माझ्यावर बोलत होते आणि दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले. 40-40 लाख रुपयांना एक-एक पेपर गेला आहे. या प्रकरणाचा पोलिसांचा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे आणि या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.
जर एमपीएससी किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग ते एसआरपीएफचे असोत किंवा आंदोलन करणारे आदिवासी समाजाचे विद्यार्थी असोत; सर्वांना पाठिंबा दिला पाहिजे. मराठी माणूस म्हणून आणि भारतीय म्हणून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे ही खूप मोठी ताकद असल्याचे ते म्हणाले.
