Advertisement
पिंपरी : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. शिल्पा या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद तर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष कलाटे यांच्या बहीण होत्या. शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, अशी ग्वाही आज रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांना फोन करुन दिली आहे.
आज शिल्पा गवारे यांच्या नणंद आणि भाजपच्या नगरसेविका स्नेहा कलाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सांत्वन केलं. यावेळी तुम्ही आमच्यासाठी देवाभाऊ आहात, रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. या भागातील आमच्या बहिणीची ही दुसरी केस आहे. त्यामुळे या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी झाली पाहिजे, चांगल्यातला चांगला वकील मिळाला पाहिजे, आज पावलं उचलली तर अशी ही प्रकरणं थांबली पाहिजे, अशी मागणी शिल्पा गवारे यांच्या नणंद आणि भाजपच्या नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
वाकडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहित महिलांनी आपलं जीव संपवलं आहे. मे 2025 मध्ये वैष्णवी हगवणे हे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूमुळे अजून किती बळी जाणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
