Advertisement
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणातील राजकीय पदाधिकारी म्हणून सातत्याने नाव समारे येणाऱ्या सुनील गाढवे याने मोठा खुलासा केला आहे. गाढवे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा दावा केला आहे. पुणे महापौरांसोबत आपला संपर्क असला तरी आपण त्यांचे वैयक्तिक सहाय्यक किंवा PA नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
सुनील गाढवे याने सांगितले की, या प्रकरणात आपण आरोपी नसतानाही सोशल मीडियावर गैरसमजामुळे आपल्याला अटक झाल्याच्या पोस्ट आणि दावे केले जात आहेत. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले.‘जर मी या पेपरफुटी प्रकरणात साधा संशयित जरी असतो, तर आज माध्यमांसमोर येऊन बोललो नसतो,’ असा दावा गाढवे याने केला. मात्र, त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र तपास यंत्रणेकडून पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या विधानाकडे त्यांचा स्वतःचा बचाव म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे.
सुनील गाढवे यांच्या राजकीय संबंधांबाबत सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपचे नवनाथ बन यांनी गाढवे हे भाजपचे नसून रोहित पवार यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील माने यांनी गाढवे हे अभिमन्यू पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे म्हटल्याचे सांगितले जात आहे.मात्र गाढवे यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसून स्वतः MPSCची तयारी करणारे परीक्षार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र त्यामुळे आपण त्या नेत्यांचे कार्यकर्ते ठरत नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
