Advertisement
गुन्हा दाखल केलाच कसा? रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवर आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणात न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
आपण केलेल्या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची अश्लीलता नसताना गुन्हा कशाच्या आधारे दाखल करण्यात आला, असा सवाल ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला. एवढे दिवस रूपाली चाकणकर शांत का होत्या? यापूर्वी तक्रार का करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित प्रकरणात कायदेशीरदृष्ट्या गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणावर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिल्यानंतर आपणही त्याला सविस्तर प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाचा संदर्भ देत ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. त्या प्रकरणात चाकणकर यांच्याविरोधातही पोलिसांनी अशीच तत्परता दाखवून कारवाई करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला. या प्रकरणातील कारवाईला आपण घाबरणार नसल्याचेही रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पोस्टमधील मजकूर, त्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि पोलिसांची भूमिका याबाबत न्यायालयीन मार्गाने दाद मागण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
