Advertisement
सगळ्या मागण्या मान्य; पाणी प्यायले पण उपोषणावर ठाम
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळ गावी 29 ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्यावतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पाण्याचा घोट घेतला मात्र उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे सांगत त्या मान्य केल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तुमच्या शब्दाचा मान राखतो, दोन सलाईन आणि पाण्याचा घोट घेतो, पण उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या मागण्यांवर जोर देताना जरांगे पाटील म्हणाले की, किमान चार प्रमाणपत्रे दिल्याशिवाय उपोषण सोडण्याचा प्रश्नच येत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ सुरू करण्यात यावे आणि या वाटपाची सुरुवात मराठवाड्यातूनच व्हावी, अशी ठाम अट त्यांनी सरकारसमोर ठेवली आहे. याशिवाय सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे.
मराठा समाजाला मोठे यश
ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती मराठा समाजाला देखील मिळणार असल्याचं प्रसाद लाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली होती, हैदराबाद गॅझेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ती अट देखील सरकारने यावेळी मान्य केली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळतील असं प्रसाद लाड यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
