Advertisement
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार नवी महिला प्रदेशाध्यक्ष
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महिला आघाडीच्या नेतृत्वात लवकरच महत्त्वाचा फेरबदल पाहायला मिळणार आहे. खानदेश भागातील रोहिणी खडसे यांनी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आता, या पदाची सूत्रे विदर्भाकडे सोपवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. नागपूर विभागातील डॉ. अंजली साळवे यांची पक्षाच्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
डॉ. अंजली साळवे या विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू अत्यंत स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुकीबाबत त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष गाजली होती.महिलांसाठी काम करणाऱ्या आणि महिलाविषयक कायद्यांची सखोल माहिती असणाऱ्या व्यक्तींनाच आयोगावर संधी मिळावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. हे पद केवळ राजकीय पुनर्वसनासाठी वापरू नये, असा स्पष्ट विचार त्यांनी मांडला होता. नागपूर विभागातील डॉ. अंजली साळवे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते लवकरच त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल.
दरम्यान, रोहिणी खडसे यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता त्यांच्याकडे पक्षाची कोणती नवीन जबाबदारी दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे, त्याच वेळी डॉ. अंजली साळवे यांच्या नियुक्तीमुळे विदर्भात शरद पवार गटाची महिला आघाडी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
