#

Advertisement

Friday, September 18, 2026, September 18, 2026 WIB
Last Updated 2026-09-18T14:34:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांकडे जाणार होते पक्षाचे नेतृत्व

Advertisement

युगेंद्र पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ 

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी चर्चा होत असते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती आणि त्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होते, असा दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे.
बारामतीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत युगेंद्र पवार बोलत होते. सध्याची राजकीय परिस्थिती आणि अजित पवार हयात असतानाची परिस्थिती वेगळी होती, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक होणार होती, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.
“दादा होते तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक होणार होता आणि पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजितदादांकडे जाणार होते. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. विलीनीकरणाबाबत बोलण्यासाठी मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. सध्या तरी या चर्चा थांबल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू असेल, तर त्याची मला माहिती नाही,” अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली.
युगेंद्र पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचाही संदर्भ दिला. त्या निवडणुकीवेळी त्यांना उमेदवार घेण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी स्वतंत्र पॅनल उभे करावे लागले, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या निवडणुकीत मात्र सुरुवातीपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, अशी भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारही लक्ष घालतील, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. तसेच सर्व वरिष्ठ नेते आपल्या पॅनलला ताकद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कारखाना कार्यक्षेत्रात प्रचारसभा घ्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याचेही युगेंद्र पवार यांनी सांगितले.