#

Advertisement

Thursday, September 24, 2026, September 24, 2026 WIB
Last Updated 2026-09-24T17:53:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"एडिटेड व्हिडिओ"वरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?

Advertisement

 

ढोबळे यांच्या कुटुंबीयांना धमक्या; बहुजन रयत परिषदेचे पोलिसांना निवेदन

धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) - नांदेड येथे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ काही समाजकंटकांनी चुकीच्या पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप बहुजन रयत परिषदेने केला आहे. या माध्यमातून महार-मांग समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत, संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी परिषदेने केली आहे.

या संदर्भात बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्याच्या वतीने धाराशिव जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. एडिट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून गैरसमज पसरवून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तसेच त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर शिवीगाळ, धमकी आणि आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून, संबंधित सोशल मीडिया खात्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५६, ३५१, १९६, ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७, ६६(सी), ६६(डी) अन्वये तातडीने एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या वेळी महेश आडगळे (धाराशिव तालुका अध्यक्ष), दत्ता कांबळे, किरण डोंगरे, अमोल कसबे, दिलीप रसाळ, हनुमंत कांबळे, विकास आडगळे, संतोष डोलारे, सत्यवान शहा (पालक, धाराशिव), सुनील शिरसागर (तुळजापूर), आम्रपाली माने (धाराशिव) आणि अंकुश शिरसागर (तुळजापूर) उपस्थित होते.