#

Advertisement

Thursday, September 24, 2026, September 24, 2026 WIB
Last Updated 2026-09-24T18:00:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नाशिक बहुजन रयत परिषद आक्रमक

Advertisement

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह, धमकीवजा मजकुराची चौकशी करण्याची मागणी

नाशिक : माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर कथितरीत्या प्रसारित होत असलेल्या बदनामीकारक, आक्षेपार्ह आणि धमकीवजा पोस्ट, व्हिडीओ व संदेशांविरोधात बहुजन रयत परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या डिजिटल सामग्रीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी परिषदेने पोलिसांकडे केली आहे.

बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य, नाशिक शहरचे अध्यक्ष अंबादास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नाशिक शहर पोलिसांचे उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी परशराम साठे, साहेबराव शृंगार, गजानन रनबावळे, युवराज आहिरे आणि अमोल गोरे उपस्थित होते.

व्हिडीओचा संदर्भ बदलल्याचा आरोप

नांदेड येथे अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या मोर्चादरम्यान प्रा. ढोबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा काही भाग अर्धवट अथवा संपादित स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मूळ वक्तव्याचा संदर्भ बाजूला ठेवून निवडक भाग प्रसारित केल्यामुळे गैरसमज निर्माण होऊन सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता असल्याचे परिषदेने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

‘डिजिटल ट्रेल’ तपासा; दोषींवर कारवाई करा

कथित संपादित व्हिडीओचा मूळ स्रोत, त्यात करण्यात आलेले बदल, तो प्रथम कोणी अपलोड केला, कोणत्या अकाउंटवरून प्रसारित झाला, प्रसारणाची वेळ, लिंक तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून त्याआधारे संबंधितांची चौकशी करावी, अशीही भूमिका परिषदेकडून मांडण्यात आली.


सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्स आणि संदेशांमुळे विविध समाजांमध्ये गैरसमज अथवा वैमनस्य निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

कायदेशीर कारवाईची मागणी

निवेदनात भारतीय न्याय संहितेतील वैमनस्य निर्माण करणारी कृत्ये, गुन्हेगारी धमकी, हेतुपुरस्सर अपमान आणि बदनामीसंदर्भातील संबंधित तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आरोपांचे स्वरूप आणि उपलब्ध पुरावे यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील लागू तरतुदींचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, तसेच नाशिकसह महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

‘कायदा हातात न घेता कारवाई करा’

“कोणत्याही समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही. मात्र सोशल मीडियावरील खोट्या, संदर्भहीन किंवा विपर्यासित सामग्रीमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. बदनामी अथवा धमकीचे प्रकार घडत असल्यास त्याची चौकशी करून कायदेशीर मार्गाने कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका अंबादास आहिरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडली.

पोलिस अधिकाऱ्यांसोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून, उपलब्ध पुरावे आणि संबंधित डिजिटल सामग्रीच्या आधारे पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाल्याचे परिषदेने सांगितले.