#

Advertisement

Monday, September 28, 2026, September 28, 2026 WIB
Last Updated 2026-09-28T14:51:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'तो' अपघात नव्हता, घातपातच !

Advertisement

रोहित पवार : १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपात असण्याचा संशय त्यांनी यापूर्वीही व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने झाले असूनही सरकार आणि सीआयडीकडून तपासाबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. लोक अजित पवारांना विसरलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले. शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक अजित पवार असते तर अनेक प्रश्नांवर तातडीने निर्णय झाले असते, असे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे सादर करणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेत एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव पुराव्यांसह जाहीर करणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्या प्रकरणाशी संबंधित व्हीएसआर कंपनी आणि ती कंपनी सांभाळणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न एका राजकीय नेत्याकडून होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

रोहित पवार यांनी सांगितले की, १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात येणाऱ्या प्रेझेंटेशनच्या अनेक प्रती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबतही रोहित पवार यांनी काही दावे केले. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे भासवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्याची चौकशी सुरू आहे. हा ब्लॅक बॉक्स कॅनडा किंवा अमेरिकेला पाठवण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. AAIBचा अधिकृत अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर स्वतंत्रपणे बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत मात्र कंपनीचे व्यवहार, कंपनीला कोणाचा पाठिंबा आहे आणि कोणत्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा दावा आहे, यासंदर्भातील पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.