#

Advertisement

Monday, September 14, 2026, September 14, 2026 WIB
Last Updated 2026-09-14T17:53:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चक्क पशुवैद्यकीय दवाखान्यात नागरिकांवर उपचार

Advertisement

धाराशिव : शिराढोण गावातील आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्याने चक्क पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेत नागरिकांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील तब्बल 24 गावांतील नागरिक अवलंबून आहेत. मात्र, या केंद्राच्या नवीन इमारतीचे काम मागील 6 वर्षांपासून रखडले होते. जागेचा प्रश्न आणि प्रशासकीय अडचणी यामुळे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी, उपलब्ध जागेतच आरोग्य सेवा सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.
प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वतःची इमारत नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी योग्य सुविधा मिळण्यात अडथळे येत होते. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मर्यादित जागेत काम करावे लागत होते. त्यामुळे या रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत नवीन आरोग्य केंद्राची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून या कामाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.