Advertisement
पंढरपूर : वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात विठ्ठलाच्या पुरातन मूर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली संवर्धनासाठी विशेष लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
या तीन दिवसांत भाविकांना श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही. मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. लेपनाचे काम पूर्ण होईपर्यंत मंदिरात दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठल मूर्तीवरील लेपनाची प्रक्रिया गेल्या काही काळापासून रखडली होती. ही प्रक्रिया जून महिन्यातच होणे अपेक्षित होते. मात्र, मूर्तीवर रासायनिक लेपन करावे की आयुर्वेदिक लेपन करावे, यावरून मतभेद निर्माण झाले होते. या प्रकरणानंतर न्यायालयीन प्रक्रियाही झाली. अखेर कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने आणि देखरेखीखाली विठ्ठल मूर्तीवर रासायनिक संवर्धन लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेऊन २३ ते २५ सप्टेंबर या तारखा निश्चित केल्या आहेत. पुरातन मूर्तीचे संवर्धन करताना तिचे मूळ स्वरूप आणि सुरक्षितता कायम ठेवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. लेपन प्रक्रियेमुळे मूर्तीचे संरक्षण होण्यास तसेच तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या तीन दिवसांच्या कालावधीत पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी नियोजनात बदल करावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन व्यवस्था पूर्ववत होणार आहे.
