Advertisement
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तब्बल १,८२६ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
मुंबई : चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी तसेच नागरी सुविधांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने मोठा आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चाकणमधील पायाभूत सुविधांसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४२६ कोटी रुपयांच्या आराखड्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. डिसेंबरपासून कामांना सुरुवात करण्याचे नियोजन असून, पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्येत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
चाकणमधील विकासकामांसाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाकण औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या मोठी आहे. परिसरातील सुमारे ७८ किलोमीटरच्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि कामकाजावर परिणाम होण्याच्या घटना घडतात.
नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांकडेला पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारे उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. जून २०२७ पर्यंत नाले मोकळे करून निचरा व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारली जाणार आहे.
चाकणमधील ४९८ किलोमीटरच्या रस्ते जाळ्याचा अभ्यास करून पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. या रस्त्यांवर पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था आणि आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असून, सहा महत्त्वाच्या चौकांची पुनर्रचना करण्याचेही नियोजन आहे. तसेच एआय आधारित सिग्नल, कॅमेरे, रडार, वाहन क्रमांक ओळख प्रणाली आणि कमांड सेंटर उभारले जाणार आहे.
दरम्यान, हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४२६ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकण, तळेगाव आणि हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारण्याचे नियोजन असून, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. चाकण परिसरासाठी १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.
